मुंबई: विधानसभा निवडणुकांंमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच वाजता पार पडणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या या भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित आहे. मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे शिंदे नेमके सत्तेत सहभागी होणार का? याबाबतची चर्चा अद्याप कायम होती. यामध्ये आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
गृहमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये सुरु झालेला अंतर्गत कलह अखेर संपल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असून ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल, अशी महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांना यासंबंधीचे पत्रही देण्यात आलं आहे.