सिंधुदुर्ग: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडची चर्चा होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा एनर्जी कंपनीकडे दोन कोटी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड हा बीडचा शॅडो पालकमंत्री म्हणून काम करत असल्याचा आरोप विरोधक आणि सत्ताधारी आमदारांकडून होत आहे. अशातच राज्यात पालकमंत्र्यांची घोषणा झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे काल दि. २० जानेवारी रोजी पालकमंत्री म्हणून प्रथमच सिंधुदुर्ग येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यात बीडची लॉबी काम करत असल्याची माझ्याजवळ माहिती असल्याचे सांगत राणे स्टाईलने अधिकारी आणि जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
राज्याचे मस्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिल्याच पत्रकार परिषदेत गुंडगिरी, दादागिरी, अवैध धंदे, याला थारा दिला जाणार नसल्याचे सांगत, बीड जिल्ह्याचे नाव सांगत कोणी इथं दादागिरी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा प्रशासन आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांना दिला आहे. काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, त्या आता पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही, असेही नितेश राणे म्हणाले.
पालकमंत्री राणे म्हणाले, की जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडावी. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमूख काम करावे. जिल्ह्याची नाहक बदनामी होईल असे काम कोणीही करु नये. जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. आपला जिल्हा दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी विकासात्मक कामांना नेहमीच प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.