मुंबई: आपल्या वादग्रस्त अश्लील कॉमेंटमुळे सध्या वादात सापडलेला यूट्युबर रणवीर अलाहाबादिया गायब आहे. रणवीर सध्या पोलिसांच्या संपर्कात नाही. त्याचा फोनही बंद असून तो घरी नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. गुरुवारी संध्याकाळी पोलीस त्याच्या घरी गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. यूट्युबर समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमात जज्ज म्हणून सहभागी झालेल्या रणवीर अलाहाबादियाने आई – वडिलांबाबत अत्यंत वाईट कॉमेंट केली. या विधानाची क्लिप वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि रणवीर मोठ्या प्रमाणात टीकेचा धनी झाला. याप्रकरणी रणवीर सोबत समय रैना विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रणवीर किंवा त्याचे वकील यांपैकी कोणाशीही पोलिसांचा संपर्क होत नाही. वास्तविक, रणवीर अलाहाबादियाला मुंबई पोलिसांनी दोन वेळा समन्स बजावले आहे. आणि त्यानुसार रणवीर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपले म्हणणे मांडेल, यासाठी मुंबई पोलीस वाट पाहात होते. मात्र, आता रणवीर गायब असून त्याचा फोनही बंद आहे. रणवीरला गुरुवारी आपला जबाब नोंदवायचा होता. मात्र, तो खार पोलीस स्टेशनला उपस्थित राहिलाच नाही.
रणवीर सोबतच समय रैना यालादेखील हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबादियाला गुरुवारी खार पोलिसांसमोर हजर राहायचे होते. मात्र, तो आला नाही. आणि त्याने पोलिसांना सांगितले की, मला मीडियाची भीती वाटते. चौकशीपासून पळ काढता येणार नाही, याची स्पष्ट कल्पना रणवीरला दिल्यानंतरही तो उपस्थित राहिला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमाचा व्हिडीओ एडिटर प्रथम सागर याने खार पोलीस स्टेशनला हजेरी लावत आपला जबाब दिला आहे.
रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लील कॉमेंट्सचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. रणवीरने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. वेगवेगळ्या राज्यात आपल्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते एकत्र करण्यात यावेत, अशी मागणी रणवीरने यात केली आहे. अभिनव चंद्रचूड यांनी रणवीर अलाहाबादियाचे वकिलपत्र घेतले आहे. त्यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला नकार दिला.