ठाणे: सध्या राज्यभरामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता ठाण्यातही शिवसेना ठाकरे पक्षाकडून युतीचे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे तथा उबाठाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमावर या युतीचं स्वागत केलं आहे. या बॅनरचं दोन्ही गटाकडून स्वागत केलं जात आहे.
ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाची आणि मनसेची सध्या राजकीय परिस्थिती एकच आहे. दोन्ही पक्ष आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशावेळी शिवसेना आणि भाजपाला रोखायचं असेल तर, दोन्ही ठाकरेंची युती झाल्यास ते संयुक्त ठरेल, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये किरकोळ भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्र हितासाठी गरज पडल्यास शिवसेना ठाकरे पक्षासोबत जाण्याची इच्छा दर्शवली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एका अर्थी सहमती दर्शवली. तेव्हापासून संपूर्ण राज्यामध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? याविषयी चर्चांना सुरुवात झाली आहे.
ठाण्यात मनसेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हांला मान्य असेल, असं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. या प्रतिक्रियेनंतर रविवारी ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षानं बॅनर झळकवत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचं स्वागत केलं.