मुंबई, दि.३१ - गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.
या महामार्गावर ९ कि.मी. चे घाट क्षेत्र असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले आहे आणि त्यांनी काम सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली असून हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
ज्या ठिकाणी डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.