नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतील भ्रष्टाचारावर माजी कृषिमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. परळी पॅटर्नचा उल्लेख करत बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांमध्ये हजारो हेक्टरवर बोगस पीकविमा घेतल्याचे त्यांनी विधानसभेत उघड केले.
धस म्हणाले, "परळीचा हा नवा पॅटर्न आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हा पॅटर्न सर्वत्र लागू करावा, गुजरातमध्येही लावा. सोनपेठ तालुक्यात १३ हजार हेक्टरवर बोगस पीकविमा भरला गेला, तर धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरवरील विमा परळीतील नावे वापरून केला गेला आहे."
त्यांनी या भ्रष्टाचारावर कडाडून टीका करत, सखोल चौकशीची मागणी केली. "भाऊचा धक्का ऐकला होता, आता भाऊचा तांडा समोर येतोय," असे म्हणत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज व्यक्त केली.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "धस यांनी जे आरोप केले आहेत, त्यातील संदर्भ काळ स्पष्ट करावेत. मीही त्या पदावर होतो, त्यामुळे या मुद्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."
धस यांनी मात्र स्पष्टपणे सांगितले की, "हा घोटाळा २०२३-२४ च्या कालावधीत झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी जाहीर करून दोषींवर कारवाई केली पाहिजे."