नागपूर: नागपूर शहरातील रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली आहे. कुठलीही परवानगी नसतांना ही कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तसेच अज्ञाता विरोधात वृक्षतोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा ही शोध घेतला जात आहे.
नागपूरचा रिंग रोड हा हिंगणा टी - पॉइंटपासून कळमनापर्यंत अनेक किमी लांबीपर्यंत पसरला आहे. मात्र, या रिंग रोडवर त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौक दरम्यान सुमारे ४ किमीच्या अंतरात दुभाजकावर लावण्यात आलेल्या शेकडो झाडांना अत्यंत क्रूर पद्धतीने कापण्यात आले आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या वृक्षतोडीमुळे अगदी २० - २० फुटांचे अशोकाचे शेकडो झाडं आता फक्त ३ ते ४ फुटांचे शिल्लक राहिले आहे. तर अनेक शोभिवंत पामच्या झाडांची पण अशाच पद्धतीने कत्तल करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, अशोकाचे ४१० तर पामचे १५२ झाड तोडण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र सिमेंटचा रिंग रोड बांधून झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षात वाढलेल्या शेकडो झाडांची अशा पद्धतीने कत्तल फक्त नागपूरच्या हिरवळीचे मोठे नुकसान नाही आहे. तर महापालिकेचे लक्ष कुठे आहे? असा प्रश्न निर्माण करणारेही आहे. या घटनेमुळे वनप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या रिंग रोडवर सुमारे ६०० झाडांच्या अवैध पद्धतीने केलेल्या कापणी बद्दल पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली असून त्यांना बोलावून त्यांची चौकशी ही केली आहे. त्यांनी झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराचा शोध सध्या सुरू आहे. झाडांची अवैध पद्धतीने कापणी केल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनीअज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.