नागपूर: देशात होणाऱ्या २१ व्या पशुगणनेचे काम अपेक्षित प्रमाणात झाले नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत निर्धारित या गणनेच्या कामाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत देशातील ७६,२३२४ गणना युनिटच्या माध्यमातून केवळ २६ टक्केच काम झाले आहे, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशू, मत्स्यपालन तसेच दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या माध्यमातून देशात एकविसावी पशुगणना होत आहे. या वेळच्या पशुगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे भटकंतीवरील, मोकाट तसेच गोशाळेतील जनावरांची देखील मोजदाद केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी पशुगणना अचूक होईल, असा विश्वास पशुपालन क्षेत्रात कार्यरत व्यक्तींकडून व्यक्त केला जात आहे. याकरिता केंद्र सरकारकडून अधिसूचना काढण्यात आल्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील पशुगणनेचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही पशुगणना युनिटला अपेक्षित उद्दिष्टपूर्तीचा पल्ला गाठता आलेला नाही. त्यामुळेच पशुगणना कार्याला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.