पुणे: पुणे जिल्ह्यातील वाघोलीमधील केसनांद फाट्याजवळ मद्यधुंद डंपर ट्रक चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांच्या अंगावर गाडी घातल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागला असून एकूण सहा जण जखमी आहेत. दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, अपघातामुळे पुणे शहर हादरलं आहे.
पुण्यातील ही घटना रविवारी रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान घडलीय. अपघातात जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले(9), नगेश निवृत्ती पवार(27), दर्शन संजय वैराळ(18), आलिशा विनोद पवार(47) हे सहा जण जखमी असून, विशाल विनोद पवार (22), वैभवी रितेश पवार (1), वैभव रितेश पवार (2) या तीन जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 4 वर्षांपासून आम्ही या ठिकाणी बिगारी काम करण्यासाठी येत असून, इथच आम्ही राहत होतो. रात्री एक वाजताच्या दरम्यान हा अपघात झालाय. आम्ही 40 जण हे कामानिमित्त पुण्यात आलो असल्याचं कामगाराने सांगितलं आहे.
मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. खरं तर फुटपाथवर झोपलेल्या व्यक्ती इतरांबरोबर कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात आल्या होत्या. त्या मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याचं बोललं जातंय. अपघातग्रस्त हे फूटपाथवर झोपलेले असताना डंपर चालकाचे डंपवरील नियंत्रण सुटले आणि डंपर त्यांच्यावर आदळला. नऊ जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर सहा जणांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 9 जणांना चिरडणारा डंपर चालक गजानन तोटेला वैद्यकीय चाचणी करून पोलिसांनी अटक केली असून, आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.