पुणतांबा: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणतांब्यातील घृष्णेश्वर मंदिरांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून विटंबना केली आहे. आरोपीच्या अटकेसाठी पुणतांबा गावातील हिंदू समाज एकवटला आहे. आठ दिवसांपूर्वीही पुणतांबा रेल्वे स्टेशन जवळील बजरंग बली मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. बजरंग बलीच्या मूर्तीवरील डोळे काढण्यात आले होते. मूर्तीची हातोड्याने अथवा दगडाने तोडफोड केल्याचे समोर आले होते. २५ डिसेंबर रोजी या हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती. त्या आधीच रात्रीच्या सुमारास आज्ञातांकडून या मंदिरावर हल्ला झाला होता. पुणतांब्यामध्ये वारंवार मंदिरांची, मुर्त्यांची तोडफोड होत आहे, या पाठीमागे नक्की कोण? या एकाच प्रश्नाने गावातील सकल हिंदू समाजात संताप निर्माण झाला आहे.
तसेच आज दिनांक २३ डिसेंबरच्या पहाटे घृष्णेश्वर मंदिरावर अज्ञातंकडून हल्ला करण्यात आला आहे. महादेव पिंडीवर दगड फेकण्यात येऊन नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्यामुळे संतप्त हिंदू समाजाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करून आज गाव बंद ठेवण्यात आले आहे. पुणतांबा गावातील आज आठवडे बाजार असतो. तो देखील आज सकल हिंदू समाजाने बंद ठेवला आहे.
या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन तोडफोड करण्यात आलेल्या मूर्तींचे भाग जमा करून घेतले आहेत. तसेच श्वान पथकाच्या साह्याने आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी शोधण्यात यश आले नाही. २४ तासापर्यंत आरोपी शोधू, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने पुणतांबा गावातील सकल हिंदू समाजाला दिले आहे. वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा घटनांमुळे पुणतांबा गावात तणाव युक्त वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंचीच धार्मिक ठिकाणे का तोडली जात आहे? या पाठीमागे कोण आहे? असे अनेक प्रश्न सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झाले आहे.