सिल्लोड: सिल्लोड येथील एका व्यक्तीला अजिंठा येथील ५ एक्कर ३ गुंठे जमीन २ कोटी ७५ लाखांत विकत देण्याचे कबुल करून करारनामा केला. त्यानंतर त्याच्या कडून ६५ लाख रुपये वसूल केले व त्या नंतर ती जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून घेतली. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या अजिंठा येथील सात लोकांविरुद्ध अजिंठा पोलिसांनी २२ मार्च रोजी रात्री ११ वाजता गुन्हे दाखल केले आहेत.
रफिक मजीद शेख (वय ३७ वर्ष) रा. मिर्झा कॉलनी सिल्लोड यांची फसवणूक झाली असून आरोपी फातेमाबी अब्दुल रहमान अली वय ७६ वर्ष रा. अजिंठा , सालेह अब्दुल समद बावजीर (वय ६६ वर्षे) रा. कटकट गेट रोड युनूस कॉलनी संभाजीनगर, अहमद सालेह बावजीर (वय ३८ वर्ष) रा. कटकट गेटरोड युनूस कॉलनी छत्रपती संभाजीनगर, मुनस्सर मोहम्मद बावजीर (वय ५१ वर्ष) रा. कन्या शाळेजवळ अजिंठा, रब्बानी हाफीज बाबजीर (वय ५० वर्ष) रा. कन्या शाळेजवळ अजिंठा, विजय मोहनलाल दसरे (वय ५३ वर्ष) रा. बालाजीगल्ली अजिंठा,व सैयद एजाज सैयद अब्बास (वय ३८ वर्ष) रा. अजिंठा आशा सात लोकांनी माझी फसवणूक केल्याची तक्रार रफिक शेख यांनी दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की २० फेब्रुवारी २४ ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ६५ लाख रुपये ऑनलाइन चेकद्वारे घेऊन माझी वरील लोकांनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती गुन्हे शाखा पोलिसांनी या घटनेची चौकशी केली व नंतर या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र अजिंठा पोलिसांना दिले. त्यावरून अजिंठा पोलिसांनी वरील फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.
यातील आरोपी फातेमाबी अब्दुल रहमान अली रा.अजिंठा यांनी त्याची मालकीची अजिंठा येथील गट नंबर ६८ मधील ५ एकर ३ गुंठे जमीन प्रति एकर ५५ लाख रुपये प्रमाणे २ कोटी ७५ लाखात कायमस्वरूपी विक्री करण्याचा करारनामा रफिक मजीद शेख यांच्या सोबत केला होता. इतर आरोपींनी फातेमाबिला नगदी व चेक द्वारे ६५ लाख रुपये आगाऊ दिले. मोजणी शीट झाल्यावर एका वर्षात रजिस्ट्री करण्याचे ठरले होते. पण सदर जमिनीची खरेदी खत करून देण्याची वेळोवेळी विनंती करून देखील वरील एक ते सात आरोपींनी संगणमत करून फिर्यादीची जाणून - बुजून पैशाची लालसेपोटी कट कारस्थान षड्यंत्र रचून फसवणूक केली व परस्पर ती जमीन दुसऱ्याच्या नावे करून घेतली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली