*बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक..!*
मुंबई | निवडणूक काळात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ हा खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघ होता. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप मोहिते यांचा शिवसेनेच्या बाबाजी काळे यांनी पराभव केला. त्यानंतर बाबाजी काळे यांनी आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत विधानभवनात जाऊन पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले.
बाबाजी काळे हे वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ओळखले जातात. खेड - आळंदी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन आदित्य ठाकरे आज विधानभवनात गेले. त्यावेळी बाबाजी काळे विधानभवन परिसरात येताच माजी मंत्री सचिन आहिर यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवण्या अगोदर काळे नतमस्तक झाले.
दरम्यान त्यांच्यासमवेत भायखळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज जामसूतकर हे देखील उपस्थित होते. माजी मंत्री सचिन आहिर यांनी विधानभवनातील कामकाजाची माहिती दिली. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या बाबाजी काळे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री सचिन आहिर, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून विधानभवनात चालणाऱ्या कामकाजाची माहिती समजून घेतली.
यावेळी खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजया शिंदे, उर्मिला सांडभोर, सुभाष मांडेकर, किरण गवारे, गणेश आरगडे, दीपक कांबळे, शेखर घोगरे, अमोल पाचपुते, संतोष राक्षे, गणेश मांडेकर, राजू चौधरी. आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.