सुरजागड खाणीमुळे अपघातांची मालिका: विकास की विनाश?
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजगड येथे लोहखनिजाचे प्रकल्प आहे या सुरजागड खाण प्रकल्पाने सुरुवातीला विकासाचे स्वप्न दाखवले, परंतु आज स्थानिक जनतेसाठी तो मृत्यूचा सापळा ठरला आहे. खाणीतील लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू असून, स्थानिक नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे.
अहेरी येथील सुभाष नगर मुत्तापूर रस्त्यावर नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातात 22 वर्षीय युवक रिजवान शेखचा प्राण गेला. हा अपघात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत झाला. अशा घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन मात्र निष्क्रिय आहे.
खाणीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे मोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बाहेरून मजूर आणले जात असून, स्थानिक तरुणांना फक्त दुय्यम दर्जाची कामे दिली जात आहेत. याशिवाय विस्थापन, आरोग्य समस्या, आणि अपघातांचा धोका ही स्थानिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहेत.
लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तर खाणकामामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. प्रशासन आणि खाणींच्या जबाबदार कंपन्या अपघात थांबवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत. मृतांच्या कुटुंबीयांना तात्पुरती मदत जाहीर करून प्रश्न संपवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र समस्यांचे मूळ निराकरण केले जात नाही.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की सुरजागड प्रकल्पाने विकासाऐवजी विनाशच आणला आहे. रोजगार आणि विकासाचे स्वप्न दाखवून खाणीच्या नावाखाली स्थानिकांचे शोषण आणि निसर्गाचा विनाश सुरू आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने या समस्यांवर तोडगा काढला नाही, तर लोकांचा आक्रोश अधिक तीव्र होईल.