मैदानी व इनडोअर खेळांनाही परवानगी द्या - आमदार क्षितीज ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - प्रशिक्षकांचे रोजगार बंद, खेळाडूंचा सराव थांबला
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशासह
मुंबई - ( मनीष गुप्ता ) कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशासह राज्यभरात लावण्यात आलेली टाळेबंदी आता हळूहळू शिथील होत आहे. अनेक व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून आता मैदानी खेळ आणि इनडोअर खेळही सुरू करावेत, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे खेळ पुन्हा नव्याने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच त्यांना परवानगी दिली जावी, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. या मागणीला स्थानिक प्रशिक्षक, खेळाडू यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
टाळेबंदीच्या काळात इतर अनेक उद्योगधंद्यांप्रमाणे मैदानी तसेच इनडोअर अशा दोन्ही खेळांवर पूर्णपणे बंदी होती. त्यामुळे टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम अशा इनडोअर खेळांपासून ते क्रिकेट, खो-खो, फुटबॉल, हॉकी अशा मैदानी खेळांपर्यंत सर्वच खेळ आणि त्यांचे प्रशिक्षण वर्ग बंद होते. एप्रिल-मे या सुट्यांच्या मोसमात हे वर्ग बंद असल्याने प्रशिक्षकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत असूनही राज्य सरकार अनेक व्यवसायांना परवानगी देत आहे. मग हे मैदानी व इनडोअर खेळ व प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात यावे, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
त्याशिवाय या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेणाऱ्या लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकांच्या मानसिक स्थितीवरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. घरात बसून तसेच इतरांना न भेटल्याने अनेक मुलांना एकलकोंडेपणा आला आहे. त्यातून नैराश्य बळावू शकतं. या परिस्थितीत मैदानी खेळ सुरू झाल्यास ही मुलं पुन्हा एकदा शारीरिक व्यायाम आणि कसरत याकडे लक्ष देतील. त्याचा चांगला परिणाम दिसेल, असंही ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
क्रिकेट स्पर्धांच्या हंगामातच खेळ बंद असल्याने हातातोंडाची मिळवणी करताना अनेक स्थानिक खेळाडूंच्या नाकी नऊ आले आहेत. विविध कंपन्यांमध्ये खेळाडू कोट्यातून नोकऱ्या मिळालेल्या अनेकांना तर स्पर्धाच होत नसल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. राज्य सरकारकडून योग्य त्या परवानग्या घेऊन या कंपन्यांदरम्यान रंगणाऱ्या स्पर्धा सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशी विनंती आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनला केल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी अजिंक्य नाईक यांनीही दिली.
आमदार क्षितीज ठाकूर यांनी नाईक यांच्या या प्रयत्नांची दखल घेत ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता थेट त्यांनाच पत्र लिहिलं आहे. आपल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प