नागपूर --- लॉकडाउनमुळे नागपूर शहरातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्थिक अडचणीत आहेत. त्यांची उपासमार होत आहे. या संकटकाळात गरजू खेळाडूंना राज्य शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही विनंती.. आजी-माजी खेळाडूंनी क्रीडामंत्री व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मनपाचे क्रीडा अधिकारी व छत्रपती पुरस्कारविजेते पीयूष आंबुलकर आणि अर्जून क्रीडा पुरस्कारविजेते विजय मुनिश्वर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने क्रीडा व युवककल्याणमंत्री सुनील केदार व जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. निवेदनात ते म्हणाले, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांतर्फे आंतरराष्ट्रीय महिला धावपटू ज्योती चौहानला उदरनिर्वाह व पोषक आहारासाठी तातडीने 25 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. ज्योतीची एकूण परिस्थिती लक्षात घेता, तिला मदत केली ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, शहरात इतरही अनेक गोरगरीब खेळाडू आहेत, ज्यांचे खायचे सध्या वांधे आहेत. अनेकांना नोकऱ्या नाहीत. लॉकडाउनमुळे त्यांचे आईवडील बेरोजगार झाले आहेत. स्वयंसेवी संघटना किंवा रेशनच्या अन्नधान्यावरच बहुतांश खेळाडू व त्यांच्या परिवाराची सध्या उपजीविका सुरू आहे. शासनाने त्यांचाही गांभीर्याने विचार करून, त्यांना नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने क्रीडामंत्री व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे केली. क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंची विचारपूस करून मागण्यांचे निवेदन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे सोपविले. विदर्भाचे क्रीडामंत्री विदर्भातील गोरगरीब खेळाडूंना न्याय मिळवून देतात काय, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी नोकरीसाठी अर्ज करून आठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही अद्याप त्यांच्या अर्जावर राज्य शासनाने विचार केलेला नाही, हे उल्लेखनीय. शिष्टमंडळात संदीप गवई, सचिन माथने, प्रवीण सोरते, रोशनी रिनके, अभिषेक ठवरे, कमलेश लांजेवार, ज्योती चौहान, प्राजक्ता गोडबोले, निकिता राऊत, प्रणाली राऊत यांचा समावेश होता.