अहिल्यानगर: प्रीतिसंगम येथे अजित पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले असतांना रोहित पवार यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी अजितदादांनी पुतण्याला कानपिचक्या देत 'दर्शन' घ्यायला लावलं. तेव्हा रोहित पवार दादांच्या पाया पडले. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले, की "मी सभेला आलो असतो, तर काय झालं असतं? असं अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले, याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार विजयी झाले आहे. त्यानंतर भाजप उमेदवार आणि मा. मंत्री राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट अजितदादांवर संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या सभा मागूनही दिल्या नाहीत, पवारांच्या कौटुंबिक कलहादरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत जामखेडमध्ये झाले, असा दावाही राम शिंदे यांनी केला. ते पत्रकार परिषद घेऊन बोलत होते.
दुसरं म्हणजे आमदार रोहित पवार स्वतःला राज्याचे भावी मंत्री आणि मु्ख्यमंत्री समजतात, त्यांनी या विधानसभा निवडणुकीत स्वतःचा आणि कुटुंबीयांचा मतदानाचा हक्क बजावला नाही, याचाही प्रत्यय आला. एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटात जे झालं, त्याचा मी बळी ठरलो" असा आरोप राम शिंदे यांनी केला.
त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत जामखेडमध्ये झाले. त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा होता, शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे. माझ्यासारखा छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता बलाढ्य शक्तीच्या विरोधात... शरद पवार १९६७ मध्ये जेव्हा विधानसभेत पोहोचले, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, अशा परिस्थितीत मी लढत दिली, माझ्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली." असंही राम शिंदे म्हणाले.