दोडामार्ग: दोडामार्ग शहरातील धाटवाडी येथे ख्रिस्त्यांचे एकही घर नसतांना डिचोली, गोवा येथील काही महिला येथे बायबल वाटून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासह धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होत्या. याविषयी हिंदूंना समजल्यावर त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने धर्मांतराचा हा प्रकार हाणून पाडला. त्यानंतर त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चार वर्षांपूर्वी दोडामार्गमध्ये एका घरात असा धर्मांतराचा प्रकार चालू होता. तेव्हाही हिंदूंनी हा प्रकार बंद पाडला होता. असे असतांना पुन्हा हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले. या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत.
धाटवाडी येथे एक मंडप उभारून तेथे हिंदू धर्मातील महिलांना बोलावून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सांगितले जात असल्याचे काही हिंदू युवकांना समजले. याविषयी खात्री झाल्यावर दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. त्यानंतर दोडामार्ग पोलीस हिंदू युवकांसमवेत धाटवाडी येथे आले, तेव्हा तेथे आलेल्या महिलांकडे बायबल आणि ख्रिस्ती धर्माविषयी प्रचार साहित्य सापडले. डिचोली, गोवा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या काही महिला येथे आल्या होत्या. या वाडीत ख्रिस्त्यांचे एकही घर नाही किंवा कुणी रहात नसतांना मंडप उभारून धर्मांतराविषयी प्रबोधन चालू होते. पोलिसांनी येथे लावलेला ध्वनीक्षेपक आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले.