मुंबई: ‘जिथं काहीच होत नाही, तिथं बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगेच्या बाता मारता, मग बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना काय करत आहात? विश्वगुरू नुसते पाहत काय बसले आहेत? तिथं धमक का दाखवत नाहीत?; असा प्रश्न शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
बांगलादेशात जे हिंदूवर अत्याचार होतायेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाऊले उचलायला हवीत. जिथे अत्याचार होतायेत तिथे धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी मोदींना भेटीची वेळ मागितली होती परंतु ती नाकारली गेली. पंतप्रधान खूप व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित बांगलादेशातीलहिंदूवरील अत्याचार त्यांच्या निदर्शनात आले नसतील. केंद्र सरकारने तात्काळ काय पाऊले उचलणार हे स्पष्ट करावे. संसदेत बाकीचे विषय एक दिवस बाजूला राहूद्या. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.