परभणी: परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका मनोरुग्णाने विटंबना केल्यानंतर परभणी पेटले असून बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘परभणी बंद’ला हिंसक वळण लागले. शहरात दगडफेक, वाहनांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी पोलिसांनी जमावावर लाठीमार व अश्रुधुराचा मारा केला. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष सदर मनोरुग्ण व्यक्तीला अमानुष मारहाण केली. त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोपान दत्तराव पवार (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीवरील काच फुटल्यानंतर कपड्याने ही प्रतिकृती झाकून ठेवण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परभणीत बंद पुकारण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसेच दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश असून, अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवण्याचा प्रयत्न केला. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला.
परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे नांदेड परिक्षेत्राचे ‘आयजी’ शहाजी उमप शहरात दाखल झाले. उमप यांनी सांगितले की, परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता. आंदोलकांनी निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तर काही ठिकाणी टायर जाळले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.