प्रयागराज: इतिहासात पहिल्यांदाच प्रयागराज येथील महाकुंभपर्वात श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ येणार असल्याची माहिती मेळा अधिकारी विजय किरण आनंद यांनी दिली आहे. शंकराचार्यांनी निमंत्रण स्वीकारले असून त्यांना शंकराचार्य मार्गावर भूमी देण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच महाकुंभपर्वात श्रृंगेरी मठाची छावणी लागणार आहे.
शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ हे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत कुंभक्षेत्री निवासाला असणार आहेत. ते मौनी अमावस्येच्या दिवशी, म्हणजे २९ जानेवारी या दिवशी पवित्र त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करतील. या ५ दिवसांते त्यांचे दर्शन, सत्संग आणि मार्गदर्शन होणार आहे. महाकुंभपर्वात आतापर्यंत शारदा, ज्योतिष आणि पुरी या पीठांचे शंकराचार्य कुंभपर्वात सहभागी झाले आहेत; परंतु श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी कुंभपर्वात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमित शहा, जे.पी. नड्डा यांनाही निमंत्रण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही.के. सिंग, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक मान्यवरांची भेट घेऊन त्यांना महाकुंभपर्वात येण्याचे निमंत्रण दिले.