सोलापूर: सोलापूर शहरातील पंकजनगरमध्ये बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीररित्या घुसखोरी केली असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत बनावट कागदपत्रांसह वास्तव्य करणार्या ६ व्यक्ती आणि त्यांना मदत करणारे ३ जण अशा एकूण ९ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर ६ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथक आणि बार्शी पोलीस ठाण्याचे पथक यांनी संयुक्तकरित्या ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींकडून पोलिसांनी रोख रक्कम १ लाख ४१ सहस्र ४०० रुपये, तसेच ४६ सहस्र रुपये किमतीचे २ भ्रमणभाष संच, २ भारतीय बनावट आधारकार्ड, बांगलादेशी कागदपत्रे, त्यात मतदान कार्ड, जन्मदाखल्यांच्या छायांकित प्रती, तसेच बांगलादेशातील नागरिकत्व दर्शवणारी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. त्यांच्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
नगमा याशिन शेख, रेहना बेगम समद शिकदर, आरजिना खातून अन्वर शेख, शिखा शाकीब बुहीया, शाकीब बादशाह बुहीया, शाएब सलाम शेख अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.