ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया !
धनंजय गोगटे
नंदुरबार, दिनांक 12 डिसेंबर, 2024
सीमांच्या रक्षणासाठी व देशाचे स्वातंत्र्य अबाधीत राखण्यासाठी सैनिकांनी आपले जीवन अर्पिले. आता आपली वेळ आहे, आपण सर्वजण सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करून महान राष्ट्रकार्यास हातभार लावूया, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.
निमित्त होते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन सोहळ्याचे यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अप्पर पोलीस अधिक्षक आशिष कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उ.दे. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, सहाय्यक परिवहन अधिकारी राहूल नलावडे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गोगटे म्हणाले, “दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून उत्साहपूर्वक पाळला जातो. या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादल देशासाठी जे कार्य करतात, त्यांच्या दृढ ऐक्याला नागरिक बळकटी लावतात. या दिवशी, समाज सशस्त्र सेना ध्वज निधीस आपला हातभार लावून आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले, त्यांचे प्रति नागरिक कृतज्ञता व त्यांची गुणग्राह्यता व्यक्त करतात. हा निधी युध्दविधवा, अपंग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाखांच्यावर आहे. हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्याच्या कामी सर्वांचा उदारतेने व स्वयंस्फुर्तीने सहभाग व मोठे सहाय्य हवे असते, असेही यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी सांगितले.
गतवर्षी 100.35 टक्के इंष्टांक पूर्ण : मेजर डॉ. निलेश पाटील
प्रास्तविकात बोलतांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील म्हणाले, गतवर्षी 100.35 टक्के इंष्टांक पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच स्वातंत्र्यापूवीच्या काळात 11 नोव्हेंबर रोजी दरवर्षी पॉपी डे साजरा करण्यात येत होता त्या दिवशी पेपर पॉपीज वितरीत करुन निधी गोळा करण्यात येत होता. ब्रिटीश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात येत असे. या निधीचा काही भाग त्यावेळच्या लष्करातील भारतीय वंशाच्या माजी सैनिकांसाठीही दिला जात असे. स्वातंत्र्यानंतर पॉपी डे ला काही उद्देश उरला नव्हता. त्यामुळे याच आधारावर स्वातंत्र्य भारतातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी निधी जमविण्याची कल्पना पुढे आली ती जुलै 1948 मध्ये संरक्षण मंत्रालयाशी सलंग्न समितीत संमत झाली. 28 ऑगस्ट 1949 रोजी संरक्षण मंत्र्यांच्या समितीने त्या सालापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्यात निर्णय जाहीर केला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले
गतवर्षी (2023) इष्टांक पूर्ण करणाऱ्या 103 कार्यालय प्रमुखांचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.