मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे 'इमर्जन्सी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपटाच्या स्क्रिनिंगआधी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्या, अभिनेत्री, खा. कंगना रणौत आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आणीबाणीच्या कालखंडातील आठवणी जागवल्या.
आणीबाणीच्या कालखंडात सर्वांचाच मानवाधिकार संपुष्टात आणण्यात आला होता, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आणीबाणीदरम्यान माझ्या वडीलांना दोन वर्ष तुरुंगात डांबण्यात आले होते. तेव्हा मी पाच वर्षांचा होतो, यादरम्यान मी वडिलांना कधी तुरुंगामध्ये किंवा न्यायालयामध्ये भेटायला जात असे. त्यावेळच्या सर्वच आठवणी आजही ताज्या आहेत. आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळ रात्र असून त्याची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. कारण, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती नव्या पिढीला द्यायला हवी. त्याशिवाय जनतेला लोकशाहीची किंमत समजणार नाही. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून हाच प्रयत्न करण्यात येत आहे", असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.