कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापिठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड - दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत.
या मोर्चाला १७ मार्चला दुपारी ३ वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल. यानंतर लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, ‘बी न्यूज’च्या कार्यालयावरून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याची समाप्ती होईल. तेथे मान्यवरांची भाषणे होतील. या मोर्चासाठी समाजातील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी १४ मार्च या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.