मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून शिवसेना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. यासंदर्भात आपल्या एक्स आकाऊंटवरून ट्विट शेअर करत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
छत्रपतींचा आशीर्वाद अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी शंभूराजांच्या मारेकऱ्याच्या कबरी भोवती किल्लाच उभा केला आहे. याउपर तीन फूटी तार येणार आहे. आता फक्त लष्कर लावायचं बाकी राहिलं आहे, अशी टीका ट्विटमधून दानवे यांनी केली आहे.
औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) दिल्लीचे एक पथक बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.