नागपूर: राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना सत्ताधाऱ्यांनी खोट्या घोषणा करण्यापेक्षा राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची गरज असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर केली आहे. सरकारकडून विविध योजनांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आकडे पुरविले जातात मात्र उपाययोजना केली जात नाही.
सर्वसामान्य जनतेसाठी पिण्याचे पाण्याचे, प्रकल्प, रस्ते याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नाही. राज्य आर्थिक दृष्ट्या कर्जबाजारी झालं आहे मात्र त्याच कोणतंही सोयर सुतक सरकारला नाही अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यांसमोर ठेवत महायुती सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
पश्चिम वाहिनी नदीचं पाणी मराठवाडयात वळविण्याचे काम करण्याची घोषणा केली मात्र अद्याप ही योजना कागदावर सुद्धा नाही. मराठवाडयात वॉटरग्रीड येणार, विदर्भात अनुशेष येणार या घोषणा केवळ पोकळ ठरल्या असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.